'वकीलाचं नाव द्या अन्यथा छपाकचं प्रदर्शन रोखू' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 11, 2020

'वकीलाचं नाव द्या अन्यथा छपाकचं प्रदर्शन रोखू'

https://ift.tt/35EGSNP
नवी दिल्लीः दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या 'छपाक' चित्रपटाच्या निर्मात्यांना आज दिल्ली हायकोर्टाने दणका दिला. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या वकीलाचंही निर्मात्यांनी चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये नाव द्यावं, असे आदेश हायकोर्टाने दिले. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालसाठी अॅडव्होकेट अपर्णा भट्ट यांनी मोठी न्यायालयीन लढाई लढली आणि तिला न्याय मिळवून दिला. अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात क्रेडिट न दिल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असं असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आलं नाही, असं वकील अपर्णा भट्ट यांचं म्हणणं होतं. या प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी झाली. वकीलाच्या नावाचा समावेश करून चित्रपटाच्या क्रेडीट लिस्टमध्ये १५ जानेवारीपर्यंत बदल करण्याचे आदेश, हायकोर्टाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी दिले. लाइव्ह स्ट्रिमिंगसह इतर ठिकाणी क्रेडीट लिस्टमध्ये बदल करण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत निर्मात्यांना मुदत दिली आहे. निर्मात्यांनी हे बदल न केल्यास १५ जानेवारीनंतर चित्रपटाचे प्रदर्शन रोखले जाईल, असं हायकोर्टाने बजावलं आहे. दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडितेवर आधारित आहे. लक्ष्मी अग्रवाल असं या पीडितेचं नाव आहे.