वर्षभरात २७०० जण ठरले लोकलचे बळी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 8, 2020

वर्षभरात २७०० जण ठरले लोकलचे बळी

https://ift.tt/2FwKabe
मुंबई: मागील २०१९ या वर्षात मुंबई विभागात २७०० प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. मागील पाच वर्षातील सर्वात कमी अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. वर्ष २०१५ च्या तुलनेत ही घट १९ टक्के इतकी आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी आखलेल्या विविध उपाययोजनांना यश मिळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात येते. त्याशिवाय, रेल्वे रुळांभोवती भिंती उभारणे, तारा लावण्याचे कामही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मागील काही वर्षात रेल्वे अपघात टाळण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडतात. वर्ष २०१८ च्या तुलनेत १० टक्के घट नोंदवण्यात आली आहे. लोकलमधून पडल्यामुळे जवळपास ६०० प्रवाशांचे मृत्यू झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत कल्याण ते कसारा आणि कल्याण-बदलापूरपर्यंतच्या मार्गांचा समावेश होतो. या भागात ३३१ प्रवाशांचा मृत्यू झाल आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत दहिसर ते राम मंदिर स्थानकापर्यंतच्या मार्गाचा समावेश होतो. या पट्ट्यात २४१ प्रवाशांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेवर कल्याण पुढील स्थानकांवर आणि पश्चिम रेल्वेवर दहिसर पुढील स्थानकांवरील प्रवाशांची संख्या वाढली आहे. परवडणारी घरे या पट्ट्यात असल्यामुळे अनेकजण मुंबईतून येथे स्थलांतरीत होत आहेत. मात्र, वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध नाहीत. बहुसंख्य प्रवाशांना लोकल वाहतुकीचा आधार असल्याकडे वाहतूक तज्ञ लक्ष वेधतात. एसी लोकल सुरू झाल्यानंतर स्वयंचलित दरवाजांमुळे लोकलमधून पडल्यामुळे होणाऱ्या अपघातामध्ये आणखी घट होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना वाटतो. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या चार एसी लोकल आहेत. सेमी एसी लोकलही लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली. मध्य रेल्वेच्या ताफ्यात नुकतीच एसी लोकल दाखल झाली असून येत्या काही महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.