नवी दिल्ली भविष्यात पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचा भाग होऊ शकतो, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज व्यक्त केला. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचं नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचं नरवणे यांनी यावेळी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीरबाबत फक्त एका आदेशाची प्रतिक्षा पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून भविष्यात तोही ताब्यात घेऊ असं स्पष्ट विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केलं होतं. याबाबत लष्करप्रमुखांना विचारलं असता त्यांनी भारतीय लष्कर यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर हा अखंड भारताचाच भाग आहे. केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवरही कब्जा करू, त्यासाठी लष्कर तयार आहे' कलम ३७० रद्द झाल्यानंतर लष्कराने काश्मीर भागात शांतता राखण्यासाठी लष्कराने अतिशय चांगलं काम केलं. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही लष्कराला साथ दिल्याचं नरवणे म्हणाले.