मुंबईः स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ५०० रुपयांची नंबर नसलेली नोट निघाली. विशेष म्हणजे ही नोट नीट कापलेलीही नाहीए. मुंबईतील फोर्ट येथील स्टेट बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेतील एटीएममधून गुरुवारी एका व्यक्तीने १० हजार रुपये काढले. या १० हजार रुपयांमध्ये ५०० रुपयांची नंबर नसलेली आणि नीट कटिंग न झालेली नोट आढळून आली. यामुळे घाबरलेल्या त्या व्यक्तीने बँक कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली. बँक कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती जाणून घेत त्या व्यक्तीला ५०० रुपयांची नोट बदलून दिली. एसबीआयच्या शाखेतील कर्मचारी निवृत्ती मराडे यांनी ही माहिती दिली. नंबर नसलेल्या या नोटचं काय करणार? नंबर नसलेली ही ५०० रुपयांची नोट आरबीआयकडे दिली जाते. आरबीआयच्या करन्स विभागात अशी त्रुटी आढळलेली नोट दिल्यास तीन पट पैसे संबंधिताला दिले जातात.