मोदींच्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार?: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

मोदींच्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार?: शिवसेना

https://ift.tt/2Pk9ZAD
मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या भारत भेटीवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टोलेबाजी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही. असं सांगतानाच या ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प पती-पत्नी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करतील. मग मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे. ट्रम्प यांच्या भेटीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मध्ये अत्यंत तिरकस शैलीत भाजपवर ओरखडे ओढण्यात आले आहेत. ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल. कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळलेलाच आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदीचा कहर सुरू आहे. ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या भारत भेटीने हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. तरीही प्रे. ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत. ट्रम्प महाराज यावे, तुमचे स्वागत आहे, असा खोचक टोलाही शिवसेनेने भाजपला हाणला आहे.

>> ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वगैरे समजणाऱ्या व त्याबरहुकूम जगात फौजदारी करणाऱ्या एका देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील व जातील. ३६ तासांनंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाहीत. >> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे? ट्रम्प आधी अहमदाबादला उतरतील. तिथे तीनेक तास घालवतील व मग दिल्लीत अवतरतील. ट्रम्प यांच्या आगमनाविषयी कुठे उत्सुकता असलीच तर ती अहमदाबादेत असायला हरकत नाही. >>ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ५०-६० लाख लोकांचा जनसमुदाय हजर राहील व तो ‘केम छो, केम छो ट्रम्प’ अशा घोषणा देईल. ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले व झोपड्या वगैरे दिसू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेस भिंती उभारल्या गेल्या. ट्रम्प यांच्या आगमनापेक्षा या लपवाछपवीचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. >> पंतप्रधान यांच्याशी होणाऱ्या चर्चेत ट्रम्प हे भारतात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या मुद्द्यास हात घालतील असे प्रसिद्ध झाले आहे. ट्रम्प यांनी यात न पडलेलेच बरे. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, शाहीन बाग हे आमचे देशांतर्गत मुद्दे आहेत व त्यातून येथील राज्यकर्ते मार्ग काढतील. हा देश लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले लोक चालवतात आणि त्यांना देशाचे स्वातंत्र्य व स्वाभिमान याबाबत बाहेरच्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबाद, दिल्ली, आग्रा वगैरेचे ‘पर्यटन’ करावे व कार्यक्रम आटोपावा हेच बरे.