बिबट्या शहरात घुसला, ऐटीत फिरला; दोघांवर हल्ला करून पळाला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 30, 2020

बिबट्या शहरात घुसला, ऐटीत फिरला; दोघांवर हल्ला करून पळाला

https://ift.tt/2ZLnlfs
म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीत पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाल्या असून, शेतमळ्याकडे पसार झालेल्या बिबट्याचा माग काढण्याचे कार्य सुरू आहे. शहरातील तिडके कॉलनी आणि मुंबई नाका भागात फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे शहरात घबराट पसरली आहे. शनिवारी (दि.३०) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सुपडू लक्ष्मण आहेर आणि राजेंद्र निवृत्ती जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात आहेर गंभीर जखमी असून, जाधव यांच्या छातीवर पंजा मारला आहे. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा हा थरार कैद झाला आहे. हल्ला केल्यावर बिबट्याने सोसायटीच्या मागील बाजूकडून परिसरातील खोडे मळा परिसरात धूम ठोकली. पहाटे सहावाजेपासून परिसरात वनविभागाचे बचाव पथक बिबट्याचा शोध घेत आहे. दरम्यान, मळ्याच्या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. बिबट्या मळ्याच्या परिसरातून गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या जंगल परिसरात गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल असून, इंदिरानगरसह आजूबाजूच्या परिसरात दिवसभर गस्त घालण्याचे आदेश वरिष्ठ वनधिकाऱ्यांनी दिले आहेत. शुक्रवारी कॉलेजरोड, एमपीए, गडकरी चौक भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची आवई उठली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी पुन्हा शहरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.