नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने करोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसंदर्भातला राजकीय पेच आता संपुष्टात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार आता २० ते २२ मेपूर्वी या निवडणूका पार पडतील असे म्हटले जात आहे. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पक्षांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत आयोगाला विनंती करणारे पत्र पाठवले होते.धाडले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही तशी विनंती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका घेण्याबाबतची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचवली. राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक आयोगाला या विधानपरिषद निवडणूक घेणे किती आवश्यक आहे हे सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.