नवी दिल्ली : कोविड १९ संकटात सर्वात पुढे राहून करोनावर मात करण्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्या 'करोना योद्ध्यां'ना देशाची सेना अनोख्या पद्धतीनं सलामी देत आहे. भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या लढावू विमानं देशातील वेगवेगळ्या भागांत कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करत आहे. भारतीय लष्कराचे बॅन्ड या रुग्णालयांजवळ करोना योद्ध्यांचं मनोबल वाढवणार आहेत. तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत करोना योद्ध्यांना सलामी देणार आहे. भारतीय हवाईदलाचे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सकाळी ७.५२ मिनिटांनी जम्मू-काश्मीरच्या दल लेकवरून फ्लाय पास्ट करताना दिसले. यानंतर ८.५५ वाजता चंदीगडमध्ये सुखना तलावावरून त्यांनी उड्डाण घेतलं. त्यानंतर ही विमानं दिल्लीमध्ये राजपथ, राजस्थानचा जलमहल, मध्यप्रदेशातील भोपाळमधील बडा तालाब, महाराष्ट्रात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह, हैदरबादमध्ये हुसैन सागर झील, बंगळुरूमध्ये कर्नाटक विधानसभा, केरळच्या त्रिवेंद्रमचं सचिवालय, तामिळनाडूच्या सुलूर, कोइम्बतूर या भागांतून उड्डाण घेताना दिसतील. हरियाणाच्या पंचकुलाच्या सरकारी रुग्णालयाबाहेर भारतीय सेनेच्या बॅन्डनं परफॉर्मन्स दिला. तसंच भारतीय हवाईदलाच्या हॅलिकॉप्टर्सनं या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला. करोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी भारतीय सेनेनं ही अनोखं ऑपरेशन हाती घेतलंय. गांधीनगर, मुंबई, जयपूर, वाराणसी, पाटणा, लखनऊ, भोपाळ, रांची, रायपूर, दिसपूर, इटानगर, शिलाँग, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये वायुसेनेची हेलिकॉप्टर्स उड्डाण घेताना दिसतील.