एअरलाइन्स दिवाळखोरीत ; 'इंडिगो'ची 'या' कंपनीसाठी फिल्डींग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 16, 2020

एअरलाइन्स दिवाळखोरीत ; 'इंडिगो'ची 'या' कंपनीसाठी फिल्डींग

https://ift.tt/3dMTrLB
नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने नव्या गुंतवणूकदारांचा शोध सुरु केला आहे. सध्यस्थितीला भारतातील आघाडीची विमान कंपनी असलेल्या 'इंडिगो'ने 'व्हर्जिन ऑस्ट्रेलिया'च्या हिस्सा खरेदी प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या काळात विमान सेवा ठप्प झाल्यानंतर दिवाळखोरी जाहीर केली आहे. दिवाळखोरीच्या लिलाव प्रक्रियेत इंडिगोची प्रवर्तक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन सहभागी होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया ही ऑस्ट्रेलियातील दुसरी मोठी विमान कंपनी आहे. कंपनीवर ५ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे कर्ज आहे. मात्र लॉकडाउनमुळे सेवा ठप्प आहे. त्यामुळे कंपनीची स्थिती डबघाईला आली आहे. व्हर्जिन समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रानसन यांनी व्हर्जिन ऑस्ट्रेलियाला वाचवण्यासाठी एक कॅरेबियन बेट गहाण ठेवण्याचा तयारी दर्शवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळेच बड्या गुंतवणूकदारांना कंपनीतील हिस्सा विक्री करण्याचा निर्णय समूहाने घेतला आहे. गेल्या १० वर्षात व्हर्जिन ऑस्ट्रेलियाला केवळ दोनदा नफा झाला आहे. जवळपास १० हजार कर्मचारी असून दररोज ६००० फ्लाईट आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने कंपनीला आर्थिक मदत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीने नव्या गुंतवणूकदाराच्या शोधासाठी प्रशासकाची नियुक्ती करुन हिस्सा विक्रीची प्रक्रिया सुरु केली आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी १० कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. यामध्ये भारतीय कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा सहभाग आहे. उद्योजक राहुल भाटिया यांची इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये ३७.८७ टक्के तर राकेश गंगवाल आणि कुटुंबीयांची ३६.६४ टक्के भागीदारी आहे. चीनमधून निष्पन्न झालेल्या करोना विषाणूने जगाला कवेत घेतले आहे. करोनाचा सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून अनेक देशांनी हवाई सेवेला रोख लावली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे दररोज प्रचंड नुकसान होत आहे. सरकारने वेळीच मदत केली नाही तर जगभरातील विमान कंपन्या पुढील दोन महिन्यात दिवाळखोरीत जातील, अशी भीती ग्लोबल एव्हिएशन कन्सल्टन्सी CAPA ने व्यक्त केली होती. सरकारांनी त्यांच्या देशातील विमान कंपन्यांना आर्थिक मदत केली नाही तर मे महिन्याअखेर जगभरातील अनेक जातील, असा इशारा CAPA ने गेल्या महिन्यात दिला होता.