कारण नसताना घराबाहेर पडले; मुंबईत १६ हजार वाहने जप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 30, 2020

कारण नसताना घराबाहेर पडले; मुंबईत १६ हजार वाहने जप्त

https://ift.tt/3igURRF
मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक लोक कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी या मुंबईकरांची वाहने जप्त केली असून काल दिवसभरात दोन-चारशे नव्हे तर १६ हजारांपेक्षाही अधिक वाहने जप्त केली आहेत. त्यात अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची वाहनेही जप्त केल्याने मुंबईकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. मुंबईकर रस्त्यावर वाहने घेऊन बाहेर पडत असल्याने गर्दी वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर हे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. कारणांशिवाय वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवत त्यांची वाहने जप्त केली होती. रविवारी साडे सात हजार वाहने जप्त केल्यानंतर कालही कारवाई सुरू ठेवत १६ हजार वाहने जप्त करण्यात आली. मुंबईत घरापासून दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरातच प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. रुग्णालयात आणि कार्यालयात जाण्यासाठी ही मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. तरीही कुणी पिकनिकच्या निमित्ताने घराबाहेर पडले, कुणी नातेवाईकांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले, तर कोणी मित्राला भेटण्याला घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. तर काही लोक कामावर जाण्यासाठी, कुणी रक्त तपासणी करण्याासाठी तर कुणी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडल्याचंही काल दिसून आलं. काल आठवड्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे शेकडो लोक वाहने घेन घराबाहेर पडले. त्यामुळे गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, दहिसर चेकनाका आणि मुलुंड चेकनाका येथे वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी काल दिवसभरात सुमारे ३८ हजार वाहने चेक केली. त्यात सर्वाधिक मोटारसायकल होत्या. पोलिसांनी काल दिवसभरात ७२ टक्के मोटारसायकल जप्त केल्या. पोलिसांनी मोटारसायकलस्वारांना टार्गेट केल्याने तेही वैतागले होते. मी स्कूटरवरून एकटाच जात आहे. किराणा सामान आणण्यासाठी मी घराबाहेर पडलो आहे. पोलिसांना किराणा सामानाची यादीही दिली. मी इथेच अंधेरीच्या वीरा देसाई रोडवर राहतो. घरापासून काही अंतरावरच आलो आहे. मात्र, तरीही मला लॉकडाऊनचा नियमभंग केल्याच्या कागदपत्रावर सही करण्यास जबरदस्ती भाग पाडण्यात आलं, असं अजय मल्होत्रा यांनी सांगितलं. तर मी माझ्या वडिलांसह स्कूटरवरून रक्त तपासणीसाठी जात होतो. पण पोलिसांनी माझी स्कूटर जप्त केली. रक्त तपासणी ही अत्यावश्यक बाब नाही का? असा सवाल गौरव केडिया यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.