'नेहरूंनी चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ मध्ये का रांगताय?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 30, 2020

'नेहरूंनी चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ मध्ये का रांगताय?'

https://ift.tt/3ihyCuA
मुंबई: चीनच्या मुद्द्यावर १९६२ पासून चर्चा करायला तयार आहोत, असं सांगणारे केंद्रीय गृहमंत्री यांना शिवसेनेनं जोरदार टोला हाणला आहे. 'पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशाचे राजकारण तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न विचारून केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. तर, भाजपही काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देत आहे. चिनी फंडिंगवरून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अमित शहा यांनी १९६२ पासून चर्चेची तयारी दाखवली आहे. आम्ही चर्चेला घाबरत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानं शिवसेनेनं 'सामना'तून भाष्य केलं आहे. 'खरे म्हणजे, १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? तो भूतकाळ आता विसरायला हवा. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. वाचा: 'पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी, चीनचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. पंडित नेहरू हे वेगळ्याच आदर्शवादाने भारून गेलेले नेते होते. ‘सत्यमेव जयते’ या भारत सरकारच्या ब्रीदवाक्यावर त्यांची भाबडी श्रद्धा होती. पंतप्रधान मोदी यांचा आध्यात्मिक शक्ती आणि बंधुभावावर विश्वास आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही. मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'भाजप-काँग्रेसनं आरोप-प्रत्यारोपांचं हे युद्ध थांबवायला हवं. मोबाइलवरील करोनाच्या कॉलर ट्यूनप्रमाणे भाजप-काँग्रेसच्या युद्धाचाही लोकांना कंटाळाला आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.