मुंबई: राज्यात करोनाचे एक लाख रुग्ण वाढल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्याने या बातम्यांवरून गृहनिर्माण मंत्री भयंकर संतापले आहेत. राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारी एक लाखावर गेली असली तरी त्यातील ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, हे सांगितलं जात नसून हा साधा चावटपणा नाही तर भलामोठा कट आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याने माध्यमांनी या बातम्या दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी अर्धवट दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांवर संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगितला जातो. पण त्यातील ५० हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळलं जातं. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे, असा आरोप करतानाच गुजरातचा मृत्युदर सांगा की, असा टोलाही त्यांनी माध्यमांना लगावला आहे. दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९५८ झाली आहे. त्यातील ५० हजार ९७८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या राज्यात केवळ ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार ९५०वर गेला असून इतर आजारांमुळे दगावलेल्यांची संख्या १३ झाली आहे. राज्यात सर्वाधिक बाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत एकूण ५८ हजार २२६ बाधित रुग्ण असून आतापर्यंत २ हजार १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.