मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील स्थलांतरीत मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याला काल वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवेश नाकारण्यात आल्याचं वृत्त आहे. प्रवेश नाकारण्यात आल्यामुळं त्यानं तिथून परतण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (RPF stops sonu sood at bandra terminus) वाचा: करोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारलं गेल्यानंतर महाराष्ट्रात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम सोनू करतो आहे. आजवर हजारो मजुरांना त्यानं खासगी बस व रेल्वेनं घरी जाण्यासाठी मदत केली आहे. अजूनही हे काम सुरूच आहे. सोमवारी देखील त्यानं उत्तर प्रदेशातील आझमगड येथील काही मजुरांना गावी जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली होती. त्यांना निरोप देण्यासाठी तो स्वत: वांद्रे रेल्वे टर्मिनसवर आला होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी दिली नाही. प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळावा म्हणून त्यानं रेल्वे पोलिसांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना तशी विनंती केली. पण त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळं टर्मिनसच्या बाहेरून प्रवाशांना निरोप देऊन तो माघारी फिरला. याबाबत त्याची प्रतिक्रिया विचारली असता, 'मी श्रमिकांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. पोलिसांनी प्रवेश दिला असता तर बरं झालं असतं. पण नाही दिला तरी फार फरक पडत नाही. लोक आपल्या घरी सुखरूप पोहोचावेत एवढीच माझी इच्छा आहे,' असं त्यानं सांगितलं. वाचा: सोनू सूद त्याच्या मदतकार्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एका लेखातून सोनूच्या हेतूवर शंका उपस्थित करून त्याच्यावर टीका केल्यानं मोठाच वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सोनू सूद याची पाठराखणही केली. भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सोनूच्या कामाचं कौतुक करत संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली होती. सोनूनं या टीकेवर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आमच्यात कुठलेही गैरसमज नसल्याचं सांगत त्यानं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणानं सोनू सूद चर्चेत येत आहे. वाचा: