गाझियाबादः करोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणा ढासळली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याचं कारण म्हणजे आणखी एका महिलेचा झालेला मृत्यू. एका महिलेला उपचारासाठी एक दोन नव्हे तर ९ हॉस्पिटल्सनी दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर मेरठमधील हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. गाझिबादमधील हे प्रकरण आहे. उपचारासाठी महिलेला कुटुंबीयांनी गाझियाबाद, नोएडा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नेले. पण एकाही हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घेतलं नाही. गेल्या काही दिवसातली ही तिसरी घटना आहे. हॉस्पिटल्सच्या निष्काळजीमुळे गाझियाबादमधील खोडा इथल्या एका झाला. छातीत दुखत असल्याने महिलेला आधी दिल्लीला नेण्यात आलं. पण तिथे एकाही हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घेतलं नाही. त्यानंतर नोएडा आणि गाझियाबादमध्ये आणलं. पण तिथेही हॉस्पिटल्सने उपचारासाठी दाखल करून घेतलं नाही. अखेरीस त्यांना मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृ्त्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केलाय. दोन दिवसांपूर्वीच एका गर्भवती महिलेचा असाच मृत्यू झाला होता. हॉस्पिटल्सनी दाखल करून न घेतल्याने महिलेचा अॅम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला होता. गाझियाबादच्या खोडामध्ये प्रताप विहार कॉलनीत राहणाऱ्या महिलेला रविवारी सकाळी छातीत दुखू लागलं. महिलेचे पती बेंगळुरूत काम करतात. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून आहेत. त्यांच्या मुलाने अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण करोना रिपोर्ट नसल्याने आणि हृदयासंबंधी आजार असल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर ते लाल बहादूर शास्त्री, एम्स, सफदरजंग आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये गेले. पण तिथेही त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. नोएडातील मेट्रो आणि कैलाश हॉस्पिटलमध्येही नेलं गेलं. पण तिथेही उपचारास नकार देण्यात आला, असा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे. गाझियाबादमधील जिल्हाच्या एमएमजी रुग्णालयात त्यांना आणलं गेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मेरठमध्ये नेण्यास सांगितलं. पुन्हा त्यांना अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी लागली. मेरठमध्ये दाखल करण्यापूर्वी अॅम्ब्युलन्समध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असं त्यांचा मुलगा अर्जुनने सांगितलं.