मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचे रौद्र रूप दाखवणारे सॅटेलाइट दृष्य हवामान विभागाने जारी केले असून हे वादळ पुढील काही तासांत ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने जिल्ह्यात समुद्र किनारी धडकण्याची शक्यता आहे. भूपृष्ठावर शिरकाव केल्यानंतर हे वादळ हाहाकार माजवण्याची भीती असून , ठाणे, रायगड, पालघरसह पुणे आणि नाशिक विभागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान कोणत्याही क्षणी किनारपट्टीवर धडकू शकते असे हवामान विभागाने सांगितले आहे. वादळ जसजसं कोकण किनारपट्टीकडे सरकत आहे तसतसा वाऱ्याचा वेगही वाढत चालला आहे. सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार रत्नागिरीत ५५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी ५५ ते ६५ किमी इतका होता. दुपारी हा वेग आणखी वाढून १०० ते ११० किमी पर्यंत जाईल. प्रत्यक्षात वादळ किनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी च्या आसपास असेल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. महत्त्वाचे अपडेट्स: > कोकणातील रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. > रत्नागिरीजवळ समुद्रात एक जहाज अडकले असून जहाजात काही खलाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. खवळलेल्या समुद्रात हे जहाज हेलकावे खात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. > सकाळी साडेनऊ वाजताच्या अपडेट्सनुसार निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १६५ किलोमीटर तर अलिबागपासून ११५ किमी इतक्या अंतरावर आहे. > ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या भागांत वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० पर्यंत असेल. तसेच मुसळधार पाऊसही कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नौदल, एनडीआरएफ सज्ज बचावकार्यासाठी नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात सज्ज झाल्या आहेत. मुंबई तसेच परिसरासाठी नौदलाचा आठ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात जलतरण चमूचाही समावेश आहे. दुसरीकडे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दहा तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत तीन, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन;तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एका तुकडीचा समावेश आहे, अशी माहिती एनडीआरएफ, महाराष्ट्रचे प्रमुख कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे.