मुंबई: विरोधी पक्षनेता म्हणून यांची गाडी रुळावर येताना दिसतेय. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारलंय. असं असलं तरी सरकारमधील अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचं त्यांचं काम सुरूच आहे. चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे,' अशी जोरदार टोलेबाजी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून करण्यात आली आहे. पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यानंतर कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं भाजपशी केलेली हातमिळवणी, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय अशा काही घडामोडींमुळं राज्यातील महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. विरोधी पक्ष भाजपकडून त्यास हवा देण्याचं काम सुरू आहे. हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधातून पडेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. विरोधकांच्या या वक्तव्यांवर 'सामना'च्या अग्रलेखातून तिरकस टोलेबाजी करण्यात आली आहे. ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. 'शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यास जर कोणी ‘शिष्टाई’, ‘मध्यस्थी’ वगैरे शब्दांचे अलंकार लावीत असतील तर ते अलंकार त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. 'देशात व राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. चीननं तात्पुरती माघार घेतली असली तरी करोनाची पीछेहाट झालेली नाही. करोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घ्यायला हवा व त्याबाबत हेळसांड करू नये. चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे व फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा,' असा टोलाही लगावण्यात आला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी संकट काळात सरकारला विधायक सूचना कराव्यात. सरकार करत असलेल्या कामातली छिद्रे शोधण्याच्या मोहिमा राबवू नयेत. रोज टीका केल्यामुळं वैद्यकीय यंत्रणेचे मनोबल घसरते. कधीकाळी राज्यकर्ते असलेल्यांना हे समजायला हवे. राहुल गांधी सैन्यदलाचे मनोधैर्य खच्ची करत असल्याचा आरोप भाजपचे दिल्लीतील नेते करतात. महाराष्ट्रात करोना योद्ध्यांच्या बाबतीत विरोधी पक्षाने तेच करू नये,' असंही सुनावण्यात आलं आहे.