
सोलापूर: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि रश्मी ठाकरे मुंबईहून पंढरपूरला आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत ड्रायव्हर ठेवला नाही. स्वत: गाडी चालवत मुंबई ते असा दोन्ही साईडचा प्रवास केला. राज्यातील मुख्यमंत्र्याने स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगण्यात येतं. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क लावल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. बैठका घ्यायच्या असतील तर त्या ऑनलाइन घेण्यावरही त्यांचा भर असतो. शिवाय करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कुठेही जायचे असेल तर ते स्वत: गाडी चालवत जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाहून मंत्रालयात जायचे असेल तरीही ते स्वत: गाडी चालवत जातात. त्यामुळे पंढरपूरला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी परवा त्यांचा ताफा निघाला, पण त्यांच्या गाडीत ड्रायव्हर नव्हता. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पंढरपूरला गेले. यावेळी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत होते. मध्यरात्री पंढरपूरला पोहोचल्यानंतर अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा झाली. यावेळी महाराष्ट्रासह देशावरील आणि जगावरील करोनाचं संकट घालवण्याचं साकडं विठ्ठलाला घातलं. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांशीही संवाद साधला. आपण सर्व माऊलींचे भक्त आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही आणि कोणी अधिकारी नाही. सर्वजण सारखेच आहेत. विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. त्यातही अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल, असंही कधी वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. आषाढी यात्रेच्या इतिहासात काल पहिल्यांदाच पंढरपुरात संचारबंदी लागू असल्याने वारकऱ्यांविना एकादशीचा सोहळा पार पडला. चंद्रभागा नदीवरील मोकळे घाट, मोकळे वाळवंट, रिकामा मंदिर परिसर आणि वारकऱ्यांविना शहर असे चित्र बुधवारी होते. राज्यभरातून आलेल्या १० पालखी सोहळ्यातील पादुकांना चंद्रभागेच्या पात्रात बुधवारी सकाळी स्नान घालण्यात आले. परवानगी दिलेल्या मोजक्या भाविकांसह चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेची परंपरा पूर्ण करण्यात आली. दर एकादशीला निघणारा विठुरायाचा रथही यंदा वारकरी आणि लवाजम्याशिवाय ट्रॅक्टरमधून काढण्यात आला. सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये मानकऱ्यांसह राही, रखुमाई आणि विठ्ठलाच्या पुरातन मूर्ती ठेवून नगरप्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. पालखी पादुकांना गुरुवारी सकाळी विठुरायाच्या मंदिरातील संत देव भेटीचा सोहळा करून परत पाठवण्यात येणार आहे. आजवर इतिहासात संतांच्या पादुका कधीही द्वादशीला परत गेलेल्या नाही.