नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेत नव्याने दाखल झालेले पाच लढाऊ विमान दिवसा आणि रात्रीही सरावासाठी सॉर्टी घेत आहेत. विविध प्रकारच्या प्रदेशात राफेलकडून सराव केला जात आहे. याचाच भाग म्हणून औपचारिक एंट्रीच्या अगोदरच हिमाचल प्रदेशात राफेलने मध्य रात्री सॉर्टी घेतली. या महिन्याच्या शेवटी एका कार्यक्रमात राफेलची भारतीय हवाई दलात औपचारिक एंट्री होणार आहे. सूत्रांच्या मते, पाच राफेल विमानांना पूर्ण क्षमतेने ताफ्यात दाखल होण्यासाठी काही महिने लागणार आहेत. २९ जुलैला अंबाला एअर बेसवर या विमानांचं लँडिंग झालं होतं. आता राफेलकडून सरावासाठी सॉर्टीज घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, चीनसोबत सध्या सुरू असलेला तणाव वाढल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे दुहेरी इंजिनचं विमान तातडीने तैनात केलं जाऊ शकतं, अशीही माहिती आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी पँगोंग त्सो आणि गोग्रा क्षेत्रात अजूनही तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डेप्सांगवर सैन्यबळ वाढवलं जात आहे. भारत आणि चीनमध्ये संघर्ष कमी करण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी स्तरावर विविध माध्यातून चर्चा झाली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेलसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. राफेलची डेलिव्हरी २०२१ अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. अत्यंत शक्तीशाली राफेल भारताला भौगोलिक परिस्थिती पाहता अत्यंत महत्त्वाचं आहे. शत्रूंकडे असलेल्या F-16s, JF-17s आणि J-20s अशा विमानांचा सामना करण्याची क्षमताही राफेलमध्ये आहे. दरम्यान, राफेलला आत्ताच तैनात करण्याची वायू सेनेला कोणतीही घाई नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात सुखोई-३० एमकेआय, मिराग-२०००, मिग-२९ आणि चिनूक, आपाचे हेलिकॉप्टर लडाखसह ३४८८ किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. अंबाला आणि हसिमारा हवाई तळांवर प्रत्येकी १८ राफेल तैनात करण्याचं प्रस्तावित आहे. पूर्व आणि पश्चिम फ्रंटला लक्षात घेता ही तैनाती असेल.