
मुंबईः नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते यांनी केला होता. राणेंच्या आरोपाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असा खोचक टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांनी मोठा जावईशोध लावला आहे. नाणार नाणार रिफायनरीबाबतच्या बैठका मंत्रालयात आणि वर्षावर होतात, असा दावा राणेंनी केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. त्यांनी केलेले आरोप बेछूट आणि पोरकटपणाचे आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी निलेश राणेंवर टीका केली आहे. निलेश राणे यांनीही विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युतर दिलं आहे. खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळं जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं. माझ्यावरचा त्यांचा राग मी समजू शकतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. निलेश राणेंनी केले हे आरोप दरम्यान, नाणार प्रकल्पासाठी काम करत असलेली एक कमिटी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या सतत संपर्कात आहेत. ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी होत नसून राजापुरातच प्रकल्प व्हावा म्हणून चर्चा केली जात आहे. या प्रकल्पासाठी विविध स्तरांवर विचारविनीमय सुरू आहे, असा दावाच नीलेश राणे यांनी केला. नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने जमीन व्यवहार केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी नावानिशी केला. सुगी डेव्हलपर्स या कंपनीने नाणारमध्ये १४०० एकर जमीन घेतली आहे. दीपक वायंगणकर या व्यक्तीमार्फत ही जागा घेण्यात आली आहे. या सुगी डेव्हलपर्सच्या संचालकांमधील एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. या कंपनीचे संबंधित ठिकाणी कार्यालय असून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे कार्यालय बंद आहे, असे राणे यांनी नमूद केले.