मुंबईः मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठा येत्या १ तासात सुरळीत होणार आहे, अभियंते व विद्युत कर्मचारी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. मुंबईतील वीज गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणांमुळं तांत्रिक बिघाड झाला आहे त्याची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. तसंच, मुंबईतील ३० ते ४० टक्के भागांत वीज सुरळीत झाली आहे. काही भागांतही वीज पुन्हा पुर्ववत होईल, असंही ते म्हणाले आहेत. मुंबई लोकल आणि रुग्णालयांमध्ये वीज पूर्ववत करण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसंच, महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
https://ift.tt/2ImQ7fJ