म. टा. प्रतिनिधी, नगर: भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नगरच्या येथील ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरातून चंदनासह इतर झाडे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पोलिसात तक्रार दिली असून, तोफखाना पोलीस ठाण्यात दिलावर अहमद सय्यद व इतरांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या बागरोजा परिसरात असणारे ऐतिहासिक स्मारक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत येते. या स्मारकाच्या परिसरात असणारे चंदन, कवठ, चिंच व बाबळीची झाडे तोडून चोरून नेले आहेत. याबाबतची माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभागाला मिळताच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना जवळपास ४३ हजार रुपये किमतीची झाडे चोरून नेल्याचे आढळले. त्यानंतर पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी मनोज पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींवर चोरीचा तसेच पुरातत्व स्थळ तथा अवशेष अधिनियम १९५८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.