म. टा. प्रतिनिधी, : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, येथे आयटी इंजिनीअरच्या बंद बंगल्यातून तब्बल साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बंगल्यातून अमेरिकन डॉलर, सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, हडपसर, मुंढवा परिसरातही घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अतुल नारखेडे (वय ४९, रा. अलंकार सोसायटी, कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बाणेर परिसरातील एका आयटी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. त्यांचा कर्वेनगरमधील अलंकार कॉलनीच्या लेन क्रमांक तीनमध्ये बंगला आहे. नारखेडे हे १९ नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हॉलच्या खिडकीचे गज उचकटून आत प्रवेश केला. बंगल्यातील मास्टर रूम व इतर तीन खोल्यांमध्ये ठेवलेले अमेरिकन डॉलर, सोने-हिरे व चांदीचे दागिने, रोख २७ हजार असा ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या बंगल्याची चावी मोलकरणीकडे होती. दुसऱ्या दिवशी दुपारी ती घरी आल्यानंतर बंगल्यात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत नारखेडे यांना माहिती दिली. माहिती मिळताच ते पुण्यात आले. त्यांनी पाहणी केली. चोरीला गेलेल्या ऐवजाची माहिती घेतली. या घटनेबाबत त्यांनी अलंकार पोलिसांत तक्रार दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला जात आहे. तसेच, त्यांच्याकडे काम करणाऱ्यांकडेही चौकशी केली जात आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक दिलीप गाडे हे अधिक तपास करत आहेत.