सलग चौथ्या दिवशी इंधन महागले ; जाणून घ्या आजचा पेट्रोल- डिझेल दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 23, 2020

सलग चौथ्या दिवशी इंधन महागले ; जाणून घ्या आजचा पेट्रोल- डिझेल दर

https://ift.tt/3kSzrKx
मुंबई : कंपन्यांनी अखेर कच्च्या तेलातील दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी वधारले. युरोपात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात टाकले आहे. अनेक देशांनी लॉकडाउनचे संकेत दिल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची भिती ओपेक देशांनी वर्तवली आहे. त्यामुळे उत्पादन कपात करण्यात येत आहे. पुरवठा मर्यादित राहिल्याने मागील आठवडाभर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनीवरील दबाव वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. आज पुन्हा पेट्रोलमध्ये ७ पैसे तर डिझेलमध्ये १८ पैसे वाढ झाली आहे. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२३ रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५३ रुपये असून डिझेल ७१.२५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.५३ रुपये असून डिझेल ७६.७२ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१० रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.४८२रुपये प्रती लीटर झाले आहे. युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. जर पुन्हा कठोर लॉकडाउन झाल्यास नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत १५ ते २० टक्के घट होण्याची शक्ययता आहे. दरम्यान करोना लस लवकरात लवकर बाजारात आल्यास इंधन मागणी सुधारेल, असा आशावाद तेल उत्पादकानी व्यक्त केला आहे. आज सोमवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव १७ सेंट्सने वाढून प्रती बॅरल ४५.१३ डॉलर झाला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव ४ सेंटसने वधारून ४२.४६ डॉलर इतका झाला. असा होतो भारतावर इंधन दरवाढीचा परिणाम जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या प्रती बॅरलमध्ये एक डॉलरची वाढ झाल्यास किरकोळ ग्राहकांसाठी प्रती लीटर इंधन दरात ४० पैसे वाढ होते. मागील जवळपास दोन महिने तेलाचा भाव ३८ ते ४० डॉलर प्रती बॅरल होता. त्यामुळे कंपन्यांनी ४८ दिवस इंधन दर स्थिर ठवेल होते. मात्र आठवडाभरात तो ४५ डॉलरच्या आसपास वाढला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमध्ये किमान दोन रुपयांची भाववाढ होण्याची शक्यता आहे.