
न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना पाकिस्तानात असल्याचे निक्षून सांगून 'पाकिस्तानच्या अबोटाबादमध्येच जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून बसला होता; पाकिस्तानने ते विसरू नये,' या शब्दांत भारताने पाकिस्तानला बुधवारी खडसावले. पाकिस्तानचे 'यूएन'मधील प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी गुटेरस यांची भेट घेऊन भारत पाकिस्तानात दहशतवादाचा प्रसार करीत असल्याचा आरोप करणारे पुरावे दिल्यानंतर भारताने 'खोटे पुरावे देणे पाकला नवे नाही,' असे सुनावले आहे. पाकिस्तानने 'यूएन'चे सरचिटचणीस अँटोनिओ गुटेरस यांना जी काही खोटी निवेदने दिली आहेत, ती अजिबात विश्वासार्ह नसल्याचे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले. त्यांनी याबाबत मंगळवारी ट्वीट केले. ते म्हणाले, 'बनावट कागदपत्रे आणि चुकीचे सांगणे हे 'यूएन'ने बंदी घातलेल्या सर्वाधिक दहशतवाद्यांचे माहेरघर असलेल्या पाकिस्तानसाठी नवे नाही. अबोटाबाद त्याने लक्षात ठेवावे.' तिरुमूर्ती यांनी अबोटाबादचा उल्लेख करून ओसामा बिन लादेन तेथे अनेक वर्षे लपून बसल्याचा दाखला दिला. अमेरिकेने मे २०११मध्ये लादेनचा पाकिस्तानात घुसून खात्मा केला. वाचा: वाचा: जम्मू-काश्मीरमधील नागरोटा येथे पाकस्थित 'जैश-ए-महंमद' संघटनेच्या दहशतवाद्यांच्या नियोजित दहशतवादी हल्ल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी सोमवारी अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान या देशांच्या राजदूतांना दिली. भारताच्या सुरक्षा दलांनी पाकचा हा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेशी निगडित सर्वंकष माहिती सादर करण्यात आली. पाकिस्तानचा या नियोजित हल्ल्यामध्ये कसा सहभाग होता, हे जगासमोर मांडण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील आगामी निवडणुकांना लक्ष्य करणे आणि तेथील परिस्थिती सातत्याने अस्थिर ठेवण्याचा पाककडून होत असलेला प्रयत्न आणि भारताला सातत्याने सतावणारी चिंता या वेळी व्यक्त करण्यात आली. वाचा: पाकिस्तानातील हेरखात्यांचे सुसूत्रीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील वीसहून अधिक हेरखात्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी 'नॅशनल इंटेलिजन्स को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (एनआयसीसी) स्थापनेस मंजुरी दिली असून या समितीचे नेतृत्व आयएसआयच्या प्रमुखांकडे असेल, असे वृत्त पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. वाचा: गुप्तवार्ता विभागाच्या समन्वयासाठी अशा प्रकारच्या यंत्रणेची स्थापना करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, या यंत्रणेची कार्यपद्धती स्थापनेनंतरच निश्चित करण्यात येणार आहे. आयएसआयचे महासंचालक हे या समितीचे अध्यक्ष असतील, अशी माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी सुरक्षा यंत्रणांमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 'एनआयसीसी' पाकिस्तानच्या 'नॅशनल काउंटर टेररिझम ऑथॉरिटी'चाही समावेश असून या यंत्रणेची पहिली बैठक तातडीने, पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एनआयसीसी'ची स्थापना हा पाकिस्तानच्या गुप्तवार्ता क्षेत्रामध्ये दीर्घकाळ अपेक्षित असलेल्या सुधारणांचा भाग असून प्रत्येक गुर्तवार्ता विभागाची भूमिका स्पष्ट करण्यासह समन्वय सुधारणे आणि क्षमता वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे.