मुंबई : मागील सहा पैकी पाच सत्रात दोन्ही निर्देशांकांनी आगेकूच केली होती. मात्र गुरूवारी झालेल्या नफावसुलीने बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. येत्या आठवड्यात बाजारात असेच संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सध्या १२७३० च्या स्तरावर आहे. मागील दोन सत्रांमधील त्याची कामगिरी पाहता निफ्टी १२९६३ ते १२७३० या दरम्यान राहील असा अंदाज चार्टव्यूव्हइंडियाचे शेअर बाजार विश्लेषक मझहर मोह्हमद यांनी व्यक्त केला आहे. ग्लॅन्ड फार्मा आयपीओने बाजारात सकारात्मक वातावरण तयार केला आहे. त्याशिवाय करोना प्रतिबंधात्मक लशींबाबत जगभरातील सकारात्मक घडामोडी कानावर येत आहेत. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही लस उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. परिणामी भांडवली बाजारात आणखी काही दिवस तेजीचे वातावरण राहील, असे मत एमके वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य संशोधक जोसेफ थॉमस यांनी व्यक्त केले. करोना लस कशा प्रकारे वितरित केली जाईल याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यातील प्रत्येक घडामोड बाजारावर परिणाम करेल, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक विनोद नायर यांनी व्यक्त केले. दरम्यान करोना लशीने युरोपात मात्र तेजीचे वातावरण आहे. युरोपातील प्रमुख भांडवली बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात तेजी दिसून आली. अमेरिकेत मात्र रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक पॅकेजची मागणी जोर धरू लागली आहे. नुकताच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. अमेरिकेचे होणारे नवे राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या नव्या प्रशासनासमोर अर्थव्यवस्था सारवणे आणि करोनावर मात करण्याचे मोठे आव्हान आहे. आज सोमवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव १७ सेंट्सने वाढून प्रती बॅरल ४५.१३ डॉलर झाला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव ४ सेंटसने वधारून ४२.४६ डॉलर इतका झाला. याआधीच्या सत्रात शुक्रवारी दोन्ही निर्देशाकांनी वाढ नोंदवली. गुरुवारच्या पडझडीतून सावरत १५० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७ अंकांनी वधारला होता. तत्पूर्वी जोरदार नफावसुलीमुळे गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८० अंकांनी घसरला आणि ४३५९९ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी १६६ अंकांच्या घसरणीसह १२७७१ अंकावर स्थिरावला होता. शेअर बाजाराच्या माहितीनुसार गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ११८० कोटींची गुंतवणूक केली. तर स्थानिक संस्थामक गुंतवणूकदारांनी २८५४ कोटींचे शेअर विक्री केले.