राजकोट: उच्चभ्रू सोसायट्यांमधील घरांमध्ये करणाऱ्या कोट्यधीश चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधील सूरतच्या पलसाना रोडजवळ ही कारवाई करण्यात आली. कोट्यधीश चोरट्याला त्याच्या अलीशान बंगल्यातून अटक केली आहे. आनंद उर्फ जयंती सीतापारा असे या कोट्यधीश चोराचं नाव आहे. त्याला हायफाय राहायला आवडायचे. त्यामुळे तो चोरी करू लागला. त्याच्या मालकीचा आलीशान बंगला आहे. त्याच्याकडे महागड्या कारही आहेत. बाप आणि मुलगा दोघेही चोरी करायचे. उच्चभ्रू सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये घुसून ते चोरी करायचे. असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात सूरतच्या पलसाना रोडजवळील आलीशान बंगल्यातून कोट्यधीश चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आनंद आणि त्याच्या मुलाने रामकृष्णनगरमधील एका घरात चोरी केली होती. घरातून त्यांनी रोकडसह ९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. मात्र, चोरी करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. २० दिवसांपूर्वी त्यांची ओळख पटवण्यात आली होती. पोलिसांनी बापलेकाला अटक करून त्यांच्याकडील साडेदहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, सव्वा लाखांची रोकड आणि सात हजार रुपये किंमतीची घड्याळे जप्त केली आहेत. तर आनंदच्या बंगल्यातून दोन दुचाकीही जप्त केल्या. त्याने आपल्या मुलासाठी कारही बुक केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.