
मॉस्को: जगभरात करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांना लशीची प्रतिक्षा आहे. मात्र, आता रशियात करोना लशीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. राजधानी मॉस्कोमध्ये शनिवारपासून लस देण्यास सुरुवात केली आहे. करोना संसर्गाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जात आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. लशीकरण मोहिमेसाठी मॉस्कोमध्ये शनिवारी ७० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. रशियाने विकसित केलेल्या 'स्पुटनिक व्ही' ही लस देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत स्पुटनिक व्ही लशीचे २० लाख डोस उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी वेळ निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉस्कोच्या महापौर सर्गेई सोब्यानीन यांनी सांगितले की, काही तासांमध्ये पाच हजार लोकांनी लस घेण्याची तयारी दर्शवली असून त्याबाबतच्या मंजुरी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला मंजुरी देण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने लशीकरणाची घोषणा केली. रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरीम निष्कर्षात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. इतर लशीपेक्षा ही लस अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाचा: रशियाच्या थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) लशीची किंमत जाहीर केली होती. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. लस चाचणीबाबतचा दुसरा अंतरीम निष्कर्षही समोर आला आहे. यामध्ये स्पुटनिक व्ही लस दिल्यानंतरच्या २८ दिवसांमध्ये ९१.४ टक्के प्रभावी ठरली आहे. तर, ४२ दिवसानंतर ही लस ९५ टक्के प्रभावी ठरली आहे. वाचा: आरडीआयएफचे किरील दिमित्रीव्ह यांनी सांगितले की पुढील वर्षात ५०० दशलक्ष नागरिकांना लस देण्याचे रशिया आणि भागिदार असलेल्या देशांचे उद्दिष्ट आहे. रशियन लशीची किंमत कमी असल्यामुळे जगभरातील अधिकाधिक नागरिकांना लस परवडणार असल्याचे त्यांनी सांगितले.