
मुंबई : गुरे चारताना देशाची सीमा चुकून ओलांडून दुसऱ्या देशाच्या भूमीत जातो...त्या देशाचे सैनिक त्याला पकडून घेऊन जातात. त्या क्षणापासून दहा वर्षं त्याची खबरबात नसते...एक दिवस कळतं की तो जिवंत आहे आणि मग सुरू होते त्याला घरी परत आणण्याची धडपड. त्यातही तीन वर्षं जातात आणि अखेर तो परत यायचा दिवस उजाडतो... एखाद्या हिंदी चित्रपटाची गोष्ट शोभावी, असं हे कथानक वास्तवात घडलं आहे आणि यातील गुराख्याची उद्या, शुक्रवारी पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका होणार आहे. (वय ५५) असं त्या गुराख्याचं नाव. कच्छमधील नाना दिनारा गावाजवळ अल्लैया या गुराख्यांच्या वस्तीत इस्माइल यांचं कुटुंब राहतं. नाना दिनारा पाक सीमेपासून अवघ्या ४० ते ५० किमीवर आहे. गुरं चारत असताना २८ ऑगस्ट, २००८ला खावडा गावाजवळ इस्माइल भटकले आणि त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं. पत्नी कमाबाईंनी शेजारच्या गावांत शोध घेतला. काहीच खबरबात लागेना तेव्हा ते सीमा ओलांडून गेले असावेत, याची खात्री पटली. त्यांच्याबद्दल नंतर कुठूनच काहीही कळलं नाही ते २०१७पर्यंत. शेजारच्या गावातला रफिक जाटही व्हिसा नियमाच्या उल्लंघनासाठी पाकिस्तानी तुरुंगात होता. त्याची सुटका होऊन २०१७मध्ये तो परतला, तेव्हा त्याने इस्माइलला तुरुंगात भेटल्याचं सांगितलं. कमाबाईंना हा सुखद धक्का होता. त्यांनी भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम ऑफ पीस अँड डेमोक्रसीच्या माध्यमातून इस्माइल यांना परत आणण्याची धडपड सुरू केली. अखेर गेल्या आठवड्यात १४ जानेवारी, २०२१ला इस्लामाबाद उच्च न्यायालयात पाकिस्तानचे उप महाभियोक्ता सय्यद तय्यब शहा यांनी इस्माइल यांची २२ जानेवारीला सुटका होणार असल्याची माहिती दिली. आता ५५ वर्षांचे असलेले इस्माइल यांची कराचीच्या लांडी तुरुंगातून २२ जानेवारीला सुटका होऊन ते रेल्वेने २३ जानेवारीला वाघा सीमेवर पोहोचतील. तिथे इस्माइल यांचे कुटुंबीय त्यांच्या स्वागताला जाणार आहेत. अमृतसरहून निघून साधारण २५ ते २६ जानेवारीपर्यंत ते पुन्हा नाना दिनाराला पोहचतील. नाना दिनारामध्ये भारत-पाकिस्तान पीपल्स फोरमचे जतीन देसाई त्यांच्या भेटीला जाणार आहेत. दरम्यानच्या काळात पतीबद्दल काहीच खबर नसणं आणि दहा वर्षांनी ते पाक तुरुंगात असल्याचं कळणं, त्यानंतर चार वर्षांनी त्यांची सुटका होणं या घटनाक्रमात कमाबाईंना प्रचंड मनस्ताप झाला. नातेवाईकांची मदत, थोडी कोरडवाहू शेती यावर कसाबसा गुजारा झाला. मुलगा आणि दोन मुलींची लग्नं झाली. मुलगा ट्रक क्लीनर आहे, दुसरा मजुरी करतो. कमाबाई गोधड्या शिवतात. इस्माइल परत आल्यावर आयुष्य नव्याने उभे राहील, कुटुंबाला आधार मिळेल, अशी आशा त्यांना वाटते. तोवर सगळ्यांच्या डोळ्यांत प्रतीक्षा आहे आणि हृदयांत धडधड. १ जानेवारी, २०२१ला एकमेकांच्या तुरुंगात... पाकिस्तानच्या तुरुंगातील भारतीय कैदी ३१९ भारताच्या तुरुंगातील पाकिस्तानी कैदी ३४०