मुंबई : पेट्रोल-डिझेलमधील महागाई, वस्तू आणि सेवा कर प्रणालीत तात्काळ सुधारणा करणे , ई-वे बिलातील समस्या दूर करण्यासाठी आज देशभरातील व्यापारी संघटनांनी एक दिवसीय संपाची हाक दिली आहे. ( Today ) या संपात माल वाहतूकदार देखील सहभागी झाले आहेत. प्रमुख शहरांमधील व्यापारी पेठा सुनसान झालाय असून तब्बल आठ कोटी व्यापाऱ्यांनी आज शटर डाऊन केले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आज शुक्रवारी संपाची हाक दिली आहे. भारत व्यापार बंदमध्ये देशभरातील जवळपास ४०००० व्यापारी संघटनांनी या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये आठ कोटी व्यापारी सहभागी झाले असल्याचे दावा CAIT ने केला आहे. या आंदोलनात छोटे मोठे व्यापारी आज दुकाने बंद ठवेनार आहेत. तसेच देशभरातील १५०० ठिकाणी धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेने म्हटलं आहे. माल वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ६ ते संध्याकाळी ८ या वेळेत चक्का जाम जाहीर केला आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, माल भरणं आणि माल उतरवणं बंद राहील. या निषेधासाठी सर्व वाहतूकदार संघटनांना दरम्यान आपली वाहनं पार्क करण्यास सांगण्यात आलं आहे. व्यापारी वर्गासाठी वस्तू आणि सेवा कर प्रणाली डोकेदुखी ठरत आहे. मागील चार वर्षात जीएसटी करात ९५० सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही व्यापारासाठी ही प्रणाली किचकट ठरत आहे. त्यामुळे सरकारने जीएसटीमध्ये तातडीने सुधारणा करून तो सोपी आणि सुटसुटीत करण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन बाजारपेठेला कठोर नियमावली करण्याची मागणी करण्यात आली आहे. आजच्या भारत बंदला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने आजच्या भारत बंदमध्ये शांततेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. तर फेरीवाला सुद्धा या संपात सहभागी झाले आहे.