म. टा. वृत्तसेवा, करोनाच्या काळात भरमसाठ वीज बिले पाठविल्याने ठाण्यात सर्वच पक्षांनी आंदोलने आणि निदर्शने करून वीज खंडित करण्यास विरोध दर्शविला. विद्युत बिले माफ करावी अशी मागणी केल्यानंतरही मानपाडा रेंटल वसाहतीत वीज खंडित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मनसेने केलेल्या विरोधामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. ठाणे येथील मानपाडा एक्मे रेंटल या निवासस्थानातील नागरिकांची बिले थकीत आहेत. परंतु, या नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मीटर कापण्यासाठी आले होते. राहण्याच्या जागेची दुरवस्था व विद्युत व्यवस्था सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आणून नागरिकांना ही बिले भरण्याची मुदत द्यावी, अशी मनसेच्या वतीने मागणी करण्यात आली. लॉकडाउन काळात लोकांची नोकरी गेली असल्याने वाढीव वीज बिलांसंदर्भात शासनाने योग्य निर्णय घ्यावा, ही थकीत बिले भरण्यासाठी नागरिकांना पुरेशी मुदत द्यावी, मात्र वीज खंडित करू नये, असो आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केले महावितरणाचे अधिकारी वीजखंडीत करण्यासाठी आल्यानंतर मनसैनिकांनी मज्जाव करीत वीज खंडित करण्यास विरोध केला आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. थकीत वीजबिले भरण्यास मुभा द्यावी, अन्यथा स्टाइलने शॉक देऊ, असा इशारा मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.