मुंबई : करोना संकटातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याने सोन्याची चमक फिकी पडली आहे. मागील नऊ महिन्यात सोन्याच्या दरात २१ टक्के घसरण झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याचा भाव ४३००० रुपयांसमीप आला आहे. लसीकरणाने घेतलेला वेग आणि अर्थव्यवस्थेत झपाट्याने होत असलेली सुधारणा पाहता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत बॉण्ड यिल्डमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उचलत गुंतवणूकदारांनी अमेरिकन बॉण्ड मार्केटमध्ये खोऱ्याने पैसे गुंतवले आहेत. तसेच डॉलरचे मूल्य वधारले आहे. त्याचा परिणाम जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीवर झाला आहे. सोन्याचा दर प्रती औंस १७०० डॉलरच्या खाली आला आहे. 'एमसीएक्स'वर (Multi Commodity Exchange) सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत २१ टक्के घसरले आहेत. तर जागतिक कमॉडिटी बाजारात सोने जवळपास १५ टक्के स्वस्त झाले असून ते १७०० डॉलरच्या खाली आले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी रात्री बाजार बंद होताना सोन्याचा भाव ९९ रुपयांनी किंचित वधारला आणि तो ४४६४० रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने दिवसभरात ४४२१७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. एमसीएक्सवर शुक्रवारी एक किलो ६५७१७ रुपयांवर बंद झाला. त्यात २०४ रुपयांची घसरण झाली होती. चांदीने दिवसभरात ६४८७५ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. दरम्यान, good returns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३५१० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४५१० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३८५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४७८४० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२१६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४५९९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६८०० रुपये आहे. ऑगस्टमध्ये सोन्याने गाठला होता उच्चांक करोना रोखण्यासाठी अनेक देशांनी कठोर लॉकडाउन जाहीर केले होते. त्यामुळे जगातिक अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. यात आर्थिक अनिश्चित काळात सोन्याचा भाव वधारला होता. भांडवली बाजारातून पैसे काढून गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट २०२० मध्ये जागतिक कमॉडिटी बाजारात सोने २०१० डॉलर प्रती औंस इतक्या विक्रमी पातळीवर गेला. तर देशांतर्गत कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५६३१० रुपये इतका झाला होता.