
न्यूयॉर्क: करोनाच्या महासाथीच्या आजाराने जगभरातील अनेक देशांचे कंबरडे मोडले आहे. करोनाच्या महासाथीच्या मोठा फटका महिलांना बसला आहे. महिलांचा रोजगार, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला महामारीचा मोठा फटका बसल्याचे निरीक्षण ‘यूएन वुमेन’च्या अनिता भाटिया यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नोंदवले आहे. अनेक महिलांना पुन्हा रोजगाराची संधी मिळवणे कठीण जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाटिया या यूएन वुमेनच्या असिस्टंट सेक्रेटरी जनरल आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ‘कोविडची साथ येऊन एक वर्ष पूर्ण होत असताना त्या साथीचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. पण महिलांवरील कौटुंबिक जबाबदारीमुळे तिच्यावरील ओझे वाढते, ही बाब या काळात अधोरेखित झाली,’ असेही भाटिया म्हणाल्या. ‘कोविडच्या साथीचा महिलांवर झालेला परिणाम हा पुरुषांहून कितीतरी पटीने अधिक आहे. रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा या बाबतीत त्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. महामारीच्या आधी पुरुषांहून तीनपट अधिक महिला विनामोबदला काम करत होत्याच. आता अशा महिलांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कारण एकाच वेळी घरकाम, मुलांचा अभ्यास आणि स्वयंपाकाची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली आहे. या काळात महिलांनी केवळ रोजगार गमावलेत असे नव्हे, तर अर्थचक्राला पुन्हा गती मिळत असताना, महिलांना त्यांनी गमावलेले रोजगार पुन्हा मिळेनासे झाले आहेत,’ असेही भाटिया यांनी म्हटले आहे. वाचा: वाचा: ...तर जीडीपीही घसरेल! ‘कोविड साथीच्या काळात जगभरात कामकरी महिलांची संख्या कमी झालेली असताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी वेढलेल्या महिलांना पुन्हा कामावर जाणे अवघड होऊन बसले आहे. हे असेच राहिले तर अर्धी लोकसंख्या कामाविना राहिल्यामुळे देशांची उत्पादकता कमी होईल आणि याचा परिणाम म्हणून जीडीपीही घसरेल,’ असा इशारा भाटिया यांनी दिला. जगभरातील देश कारभार पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असताना या प्रक्रियेदरम्यान महिला केंद्रस्थानी कशा राहतील, हे पाहणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.