पत्नीची हत्या केली; नंतर त्यानंही धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 11, 2021

पत्नीची हत्या केली; नंतर त्यानंही धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवलं

https://ift.tt/2OLGHxl
बोइसर: जिल्ह्यातील बोईसर येथे बुधवारी धक्कादायक घटना घडली. आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर ४८ वर्षीय पतीने येथे धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. बोइसर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नीचे मध्यरात्री अडीचच्या सुमारास भांडण झाले होते. या रागातून पतीने स्वयंपाक घरात जाऊन चाकू घेतला आणि पत्नीला भोसकले. यात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी तो रात्री नऊ वाजताच्या सुमारास कामावरून घरी आला. त्याची अकरा वर्षांची मुलगी दुसऱ्या खोलीत होती. तर नऊ वर्षांचा मुलगा हा घराबाहेर गेला. या दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी त्याने शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजारी धावून आले. त्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. त्यानंतर कुटुंब रात्री झोपी गेले. मध्यरात्री दोनच्या सुमारास पुन्हा या दाम्पत्यामध्ये भांडण सुरू झाले. पुन्हा मुलगा घराबाहेर गेला आणि त्याने शेजाऱ्यांना बोलावले. मुलगी आपल्या खोलीतच होती. शेजारी धावून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. त्यानेच दरवाजा उघडला. आतमधील दृश्य बघून त्यांनाही धक्का बसला. त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. साधारण साडेतीनच्या सुमारास पालघर रेल्वे पोलिसांना लोको पायलटकडून माहिती मिळाली. एका व्यक्तीने बोइसर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पती-पत्नीमधील वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली जाणार आहे. या घटनेची नोंद करून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.