नारायण दाभाडकर निधन: अफवा आणि वास्तव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

नारायण दाभाडकर निधन: अफवा आणि वास्तव

https://ift.tt/3eCwqNv
म. टा. प्रतिनिधी, 'नारायण दाभाडकर यांनी दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयातील बेड सोडला' ही बातमी प्रसिद्ध होताच बुधवारी दिवसभर उलटसुलट चर्चांना उधाण आले. ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या कोव्हिड रुग्णाला डॉक्टरने सुटी कशी दिली, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. संबंधित व्यक्तीचे निधन झाले नसल्याची खोटी पोस्टही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. हे एलएडी चौकातील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात होते. या विषयाच्या अनुषंगाने पुण्यातील एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. ती मेयो इस्पितळाच्या अधिष्ठात्यासोबतच्या संवादाची होती. दाभाडकर नावाचे रुग्ण आमच्याकडे नव्हते, अशी स्पष्टोक्ती मेयोच्या अधिष्ठात्यांनी त्यात दिली. दोन्ही रुग्णालये इंदिरा गांधींच्या नावावर असल्याने या गोंधळात भर पडली. 'महापालिकेच्या गांधीनगर परिसरातील इंदिरा गांधी रुग्णालयात बाबा दाखल झाले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी ५५पर्यंत खाली आली होती. मोठ्या प्रयत्नांनी मिळालेला बेड त्यांनी अन्य रुग्णासाठी परोपकारातून सोडला', असा दावा दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी बुधवारी जारी केलेल्या व्हिडीओतून केला. 'बेड सोडण्याचे मूळ कारण बाबांनी केवळ मला आणि कुटुंबीयांनाच सांगितले होते. त्याचा उल्लेख दवाखान्यात अन्यत्र कुणाजवळही केला नव्हता. मला घरी जायचेय एवढाच त्यांचा आग्रह होता', असेही आसावरी यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. वाचा: दरम्यान, समाजमाध्यमांमध्ये फिरणाऱ्या अनेक पोस्ट अतिरंजित होत्या. काही व्हॉट्सअप गटांमध्ये या प्रकरणांवरून आरोप-प्रत्यारोप झाले. गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला सुटी देणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवत नाही, असा आक्षेप काहींनी घेतला. प्रकृती खालवाली असताना दाभाडकरांना बाहेरच्या रुग्णांची ओरड कशी ऐकू आली, अशी शंकाही अनेकांनी घेतली. वैद्यकीय सूत्र म्हणतात...एखाद्या रुग्णाने स्वत:च्या हमीवर घरी जायचे आहे, असा हट्ट केला तर रुग्णालयातून सुटी मिळू शकते. त्यात काही गैर नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 'मागील २२ एप्रिलला संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान दाभाडकर आमच्या इस्पितळात दाखल झाले. त्यांना श्वास घ्यायला बराच त्रास होत होता. त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र नातलगांनी विनंती केल्यानंतर पावणेआठ ते आठच्या दरम्यान त्यांना घरी नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबतचा सर्व रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे', असे डॉ. हरदास यांनी त्यांच्या एका जारी झालेल्या व्हिडीओत म्हटले आहे.