मुंबई : करोना रुग्णवाढीत झालेली वाढ आर्थिक विकासाच्या वाढीत अडथळा ठरेल. नव्याने घातलेले निर्बंध विकासाला मार्क ठरतील, अशी भीती व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने आज ठेवले. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता होती मात्र तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये Cash Reserve Ratio (CRR) ३.३५ टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढाव्यात बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर ५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षात भारताचा विकास दर १०. ५ टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला. आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले.