
पुणेः करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरासह महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यांची संख्या धडकी भरवणारी आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर राज्यभरातील डॉक्टरही रुग्णांसाठी अहोरात्र झटत आहेत. पुण्यातील डॉक्टर मुंकुद पेनुरकर यांचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. पेनुरकर यांच्या वडिलांचा करोनामुळं मृत्यू झाला तर, आई व भाऊ रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहेत. मात्र, या संकटाच्या काळात खचून जाता त्यांनी रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. डॉक्टर पेनुरकर हे पुण्यातील संजीवन रुग्णालयात गेल्या १० वर्षांपासून कार्यरत आहेत. आपल्यामुळं घरातील सदस्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी आई-वडिलांना नागपुरला लहान भावाकडे पाठवलं होतं. मात्र, तरीही त्यांना करोनानं गाठलं. सर्वात आधी त्यांच्या लहान भावाला करोनाचा संसर्ग झाला व त्यामुळं आई- वडिलांनाही करोनाची बाधा झाली. नागपुरात ऑक्सिजन बेडच्या कमतरतेमुळं कार्डियाक रुग्णवाहिकेच्या मदतीनं तिघांना पुण्यातील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या दरम्यान त्यांच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. भाऊ आणि आई रुग्णालयात असताना डॉक्टरांनी एकट्यांनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते रुग्णालयात सेवेसाठी हजर राहिले. त्यानंतर खंड न पडता ते रुग्णांची सेवा करत आहेत. सध्याची परिस्थिती खूपच नाजूक आहे. ही वेळ आराम करण्याची नाहीये. रुग्णांना आमची गरज आहे. आम्ही त्यांचं दुखः पाहू शकत नाही, असं डॉक्टर मुकुंद यांनी म्हटलं आहे. तसंच, मी स्वतः या अवस्थेतून जात आहे. माझी आई व भाऊ रुग्णालयात करोनाशी झुंज देत आहेत. अशातच मी अन्य रुग्णांवरील उपचार थांबवू शकत नाही, त्यांनाही उपचारांची गरज आहे, असं डॉक्टर मुकुंद यांनी म्हटलं आहे.