
मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत असली तरी आर्थिक नुकसान फारसे होऊ नये आणि अर्थचक्र सुरळीत सुरु रहावे यासाठी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या उपाययोजनांनी गुंतवणूकदार आश्वस्त झाले आहेत. त्यांनी बाजारात खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. आज गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७ अंकांनी वधारला असून तो ४८७१५ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा २५ अंकानी वधारला आहे. तो १४६४३ अंकांवर आहे. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला होता. आजच्या सत्रात ब्लुचिप शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एसबीआय, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एचयूएल, एशियन पेंटस, बजाज फायनान्स, इंड्सइंड बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर मारुती, बजाज आॅटो, एल अॅंड टी, आयटीसी, एचडीएफसी हे शेअर तेजीत आहेत. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १६ शेअर घसरले आहेत तर १४ शेअर तेजीत आहेत. आज आशियातील बाजारात तेजी दिसून आली आहे. सिंगापूर, चीन, जपान, शांघाई आदी शेअर बाजार तेजीत होते. जपानचा निक्केई निर्देशांक २१४ अंकांनी वधारला. तर बुधवारी अमेरिकेतील भांडवली बाजारात तेजी दिसून आली. डाऊजोन्स, नॅसडॅक आदी बाजार तेजीसह बंद झाले. चलन बाजारात रुपयाने बुधवारी चांगली कामगिरी केली होती. तर त्यानंतर त्यात अवमूल्यन झाले. डॉलरसमोर तो ६ पैशांनी घसरला. सध्या रुपया सावरला असून तो ७ पैशांनी मजबूत होऊन ७३.८४ वर आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यात १.२९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मार्च २०२० नंतर एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात केलेली ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. अर्थव्यवस्थेला रोख चणचण भासू नये यासाठी आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली. यासाठी रेपो दराने बँकांना हा निधी पुढील तीन वर्षांसाठी उपलब्ध होईल. या विशेष खिडकीची सुविधा ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. आज बँकेने अतिरिक्त रोकड उपलब्ध करणे, वैयक्तिक कर्जदार आणि उद्योजकांसाठी कर्जपुनर्रचनेचा पर्याय, राज्यांना अतिरिक्त कर्जाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीचा कर्जदारांवर होणार परिणाम पाहता रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा एका वेळेसाठी कर्ज पुनर्रचनेचा (one-time restructuring) पर्याय खुला केला आहे. वैयक्तिक कर्जदार आणि सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योजकांना याचा लाभ घेता येईल, असे दास यांनी यावेळी सांगितले.