लंडन: भारतासह जगभरातील अनेक देश करोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. जवळपास १४ महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये सोमवारी एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. ब्रिटनमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आता लॉकडाउनचे निर्बंधही शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून करोनाच्या संसर्गाने जोर धरला होता. जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये सरासरी ७० हजार बाधित आढळत असल्यामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याच बरोबरीने वेगाने लसीकरण मोहीम सुरू झाली होती. करोनाच्या संसर्गाला नियंत्रित करण्यात आता ब्रिटनला यश आल्याचे चित्र आहे. सध्या दररोज सरासरी दोन हजार बाधित आढळत आहेत. वाचा: वाचा: ग्रेट ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये रविवारी एकाही करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती. तर, वेल्समध्ये सोमवारी चार करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये याआधी १० मे रोजीही एकाही बाधिताचा मृत्यू झाला नव्हता. तर, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच एकाही करोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. ग्रेट ब्रिटनमध्ये आतापर्यंत करोनाच्या संसर्गामुळे एक लाख २६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. वाचा: वाचा: दरम्यान, ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीमुळे करोनाच्या संसर्गाने मृत्यू होण्याच्या प्रमाणात ८० टक्के घट झाली असल्याचे समोर आले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. एस्ट्राजेनका लशीमुळे करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका ८० टक्के कमी झाला असून फायजरच्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर मृ्त्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी झाला आहे. लसीकरणामुळे करोना महासाथीपासून बचाव करता येऊ शकतो हे स्पष्ट होत असल्याचे ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.