करोनावरील उपचारांसाठी देशीदारूचा उतारा; डॉक्टरनेच केला दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

करोनावरील उपचारांसाठी देशीदारूचा उतारा; डॉक्टरनेच केला दावा

https://ift.tt/3vXZeak
म. टा. प्रतिनिधी, नगर: करोना रुग्णांवर उपचारासाठी योग्य मात्रेतील देशी दारूचा वापर उपयुक्त ठरत असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरूण ताराचंद भिसे यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी यासंबंधीचा अनुभव सांगणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या उपचाराने पन्नास रुग्ण आपण बरे केल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून मंगळवारी तहसिलदार अर्चना पागिरे यांनी डॉ. भिसे यांना चौकशीला बोलाविले आहे. डॉ. भिसे यांचे बोधेगावमध्ये सिताई हॉस्पिटल आहे. आयुर्वेद शास्त्रातील (बीएएमएस) वैद्यकीय पदवी असलेले डॉ. भिसे अनेक वर्षांपासून येथे सेवा देत आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला. त्यांची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. त्यामध्ये डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, मी आज खूप जबाबदारी व प्रामाणिकपणे तसेच जड अंत:करणाने माझा अनुभव तुमच्यासमोर हिमतीने मांडतोय. मला यातून प्रसिद्धी किंवा पैसा दोन्ही कमवायचे नाही. याचे श्रेय डॉ. आर. के. संघवी व माझ्या एका अशिक्षित रुग्णाला जाते. एका रुग्णाच्या मुलाने आपल्याला हा अनुभव सांगितला, असं भिसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एप्रिल महिन्यात बेड मिळत नसल्याने या महिला रुग्णाला घरीच ठेवण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णाचा सीटीसी स्कोअर जास्त असल्याने व्हेंटीलेटरची अवश्यकता सांगितली होती. मात्र, सोय न झाल्याने रुग्णाला घरीच ठेवले. साठ वर्षांच्या या महिलेवर घरगुती काढे व उपाय सुरू झाले. कोणी तरी सल्ला दिला म्हणून रुग्णाला ६० मिलीलिटर देशी दारू दिली. ती घेत्यानंतर रुग्णाला भूक लागली. असेच काही दिवस रोज थोडी थोडी दारू दिली आणि रुग्ण बरा झाला. हा अनुभव ऐकल्यानंतर आपण शोध सुरू केला. इंटरनेटवर बरीच माहिती मिळाली. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने दारू हे करोनावरील उपयुक्त औषध नसल्याचे स्पष्ट केले होते, हे पाहून हिरमोड झाला. मात्र, याकडे दुर्लक्ष करून आपण थेट रुग्णांवरच प्रयोग करण्याचे ठरवले, असंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णांची संमती घेऊन सुमारे पन्नास जणांवर असा उपचार केला. त्यातील दहा रुग्ण गंभीर स्वरूपाचे होते. या रुग्णांवर सरकारी नियमांप्रमाणे उपचार सुरू ठेवलेच त्यासोबत दररोज सकाळी सायंकाळी ३० मिलीलीटर देशी दारू दिली. याचे चांगले परिणाम दिसून आले असून जवळपास सर्व रुग्ण बरे झाले. यासंबंधी तज्ज्ञांना समोर योग्य त्या पुराव्यांनिशी बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. मात्र, औषध म्हणून ते सात ते दहा दिवस द्यायचे आहे, यातून आपल्याला दारूच्या व्यसानाचे समर्थन करायचे नाही, असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे. याचा प्रयोग करून पाहण्याचा सल्ला देताना डॉ. भिसे यांनी सरकारी संस्थांनाही यावर गांभीर्याने विचार करून संशोधन करण्याची विनंती केली आहे. ‘डीआरडीओ’च्या ज्या औषधाला मान्यता मिळाली आहे, त्या औषधातील फॉर्म्युला आपल्या उपचार पद्धतीशी साधर्म्य दर्शविणारा असल्याचा दावाही डॉ. भिसे यांनी केला आहे. डॉ. भिसे यांची ही पोस्ट त्यांच्या नाव व क्रमांकासह व्हायरल झाली. सरकारी पातळीवरही दखल घेण्यात आली. शेवगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी डॉ. भिसे यांच्या रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. योग्य ती खात्री झाल्याशिवाय अशा पोस्ट व्हायरल करू नका, अशी समज त्यांना दिली. त्यानंतर शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागिरे यांनी आज मंगळवारी डॉ. भिसे यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. चौकशीत काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. डॉ. भिसे यावर ठाम असून आपण आपला उपचार पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, असा दावा केला आहे.