
मुंबई : करोना संकटामुळे राज्यासह देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तसंच या व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थचक्रालाही मोठा धक्का बसला आहे. राज्यातील याच स्थितीवरून मनसेचे () नेते संदीप देशपांडे यांनी खरमरीत शब्दांत मुख्यमंत्री (CM ) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहे, पण औषध नाही. व्यापारी आहे, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,' असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. करोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर मनसेकडून सातत्याने टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यामुळे मनसेच्या या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील वादावर नाराजी व्यक्त केली होती. 'जुनी म्हण आहे... भीक नको पण कुत्र आवर. आता म्हणावंस वाटतंय की लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या ब्लेम गेममध्ये जनतेचाच गेम होतोय. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे,' असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं होतं.