
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत लसीकरण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत आता १२ ते १५ या वयोगटाचे लसीकरण होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात या वयोगटासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बहुतांशी मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायजरने ही १२ ते १५ या वयोगटासाठी करोना लस विकसित केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरिस फायजरने १२ ते १५ वर्ष या वयोगटातील २२६० स्वयंसेवकांची लस चाचणी केली होती. या चाचणीत लस घेतलेल्या मुलांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर प्रौढांसारखेच दुष्परिणाम जाणवू लागले होते. यामध्ये थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे आदी लक्षणे जाणवली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर किमान दोन वर्ष देखरेख ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लशीमुळे मिळालेली सुरक्षिता किती दीर्घकालीन आहे, याचा अभ्यास करता येईल. वाचा: वाचा: फायजरशिवाय मॉडर्नानेही अल्पवयीनांसाठी लस विकसित केली आहे. मॉडर्नाने १२ ते १७ या वयोगटासाठी विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. येत्या काही महिन्यात या चाचणीचे निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. वाचा: दरम्यान, भारतातील करोनारुग्णांची वाढती स्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार युनिसेफच्या माध्यमातून भारताला विविध आवश्यक सुविधा देण्यात आल्या असून यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश आहे.आरोग्य चाचण्यांसाठी आवश्यक उपकरणे, ८५ आरटी-पीसीआर यंत्रे, अन्य आवश्यक वैद्यकीय वस्तू व तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही भारतात धाडले आहेत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्र व ईशान्य भारतात ऑक्सिजननिर्मितीचे २५ प्रकल्प सुरू करण्यासाठी युनिसेफ सहकार्य करत आहे.