
अमरावती : कोरोनामुळे लॉकडाऊन असलं तर मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडताना दिसत आहे. अशात एका नवरदेवाला लग्नाची हळद चांगली महागात पडली. हल्ली लग्नापेक्षा हळदीमध्ये लोक जास्त मज्जा करतात. अशीच धमाल मज्जा नवरदेवानं केली पण त्याला मात्र याचे थेट ५० हजार मोजावे लागले आहे. चांदूर रेल्वे शहरात हा प्रकार समोर आला असून सध्या या नवरदेवाची जोरदार चर्चा सुरू आहे. संचारबंदीमध्ये लग्नप्रसंगी दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नवरदेवाला ५० दंड भरावा लागला आहे. रात्री ११ वाजता स्थानिक महसुल, नगर परिषद व पोलीस विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. चांदूर रेल्वे शहरातील राम नगरमधील एका व्यक्तीच्या घरी लग्नाच्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम मंगळवारी धुमधडाक्यात सुरू होता. सदर माहिती पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार मगन मेहते सहकाऱ्यांसह लग्न घरी दाखल झाले. लग्नाच्या हळदीला मोठ्या उत्साहात असणाऱ्या कुटुंबाने संचारबंदीचे नियम मोडत कार्यक्रम केला. यामध्ये नवरदेवानेही धमाल डान्स केला. या कार्यक्रमाची माहिती मिळताच महसूल विभाग व नगर परिषदची टीमदेखील या ठिकाणी पोहचली आणि कारवाई करत ५० हजारांचा दंड वसूल केला. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी लग्नकार्य सुरू आहे. अशातच या प्रसंगी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एवढी मोठी कारवाई चांदूर रेल्वे तालुक्यात पहिल्यांदाच झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. खरंतर लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीने का होईल अनेक लग्नसोहळे पार पडत आहे. पण त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचंही समोर आलं आहे. यामुळे या संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे.