...म्हणून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची लसीकरणाकडे पाठ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

...म्हणून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची लसीकरणाकडे पाठ

https://ift.tt/3tw3En5
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातले लसीकरण करून घेण्यासाठी अनेक लाभार्थी धडपडत असताना, या शहराने अव्हेरलेल्या कामाठीपुऱ्यातील शरीरविक्रय करणाऱ्या महिला मात्र, या संपूर्ण प्रक्रियेपासून अलिप्त आहेत. कुणी लस घेतली का, असा प्रश्न त्यांना विचारला तर त्या घाबऱ्याघुबऱ्या होतात, विषय टाळतात वा लसीकरण नको, त्याने नसते आजार होतात, अशी उत्तरे देतात. मुंबईमध्ये लसीकरणाचा दर चांगला आहे, असा दावा करणाऱ्या यंत्रणा कामाठीपुरा, फॉकलंड रोड, नवी मुंबईसह उपनगराच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मनातील लसीकरणाची भीती अद्याप काढू शकलेल्या नाहीत. प्रेरणा या संस्थेच्या प्रीती पाटकर यांनी येथील महिलांच्या मनामध्ये लसीकरणासंदर्भात अद्याप भीती आहे, असा अनुभव सांगितला. बहुदा एकाही महिलेने लसीकरणासाठी नावनोंदणी केली नाही.करोनाला प्रतिबंध करणारी लसही घेतलेली नाही. लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यापूर्वी या महिलांचे समुपदेशन करणे, त्यांच्या मनातील लसीकरणाची भीती काढून टाकणे गरजेचे आहे. अनेक जणींना करोना हा आजार का होतो, त्याची कारणे काय आहे याचीही पूर्णपणे माहिती नाही, याकडे पाटकर लक्ष वेधतात. वाचा: काही वर्षांपूर्वी एचआयव्हीसंसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर या महिलांमध्ये या आजाराविषयी जाणीवजागृती करण्याचे काम वैद्यकीय यंत्रणेसह एड्स नियंत्रण संस्थेनेही चोख बजावले होते. आताही या महिला लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतील याची वाट पाहण्यापेक्षा या भागाशी जवळ असलेल्या नायर वा जेजे रुग्णालयाच्या पुढाकाराने येथे समुपदेशन व लसीकरण सुविधांचे आयोजन लशींचा सुरळीत पुरवठा सुरू झाल्यानंतर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून या व्यवसायामध्ये असलेली झुबेदा सांगते, आता हा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. करोनाचा संसर्ग झाला, तर वैद्यकीय उपचार करण्याची मानसिक तयारी व गरज लागल्यास आर्थिक कुमक उभी करण्याचीही ताकद आता या महिलांमध्ये राहिलेली नाही. एचआयव्हीबद्दलही या महिलांच्या मनामध्ये विविध प्रकारच्या शंकाकुशंका होत्या.मात्र, हळूहळू गैरसमज दूर होत गेले.त्यांनी निरोध वापरणे, आरोग्यचाचण्या करून घेण्याची सुरुवात केली. करोनाच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर व्हायलाही असाच काही काळ जावा लागेल.मात्र, तोपर्यंत या महिलांना दुर्लक्षित ठेवून चालणार नाही.हादेखील समाजाचा एक भाग आहे हे समजून त्यांचेही लसीकरण व्हायला हवे, असे मत ऊर्जा संस्थेच्या एम.एम. मिनल यांनी व्यक्त केले. वाचा: अज्ञान, तंत्रज्ञानाशी ओळख नसणे या लसीकरणाच्या नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आहेत असे, वसुमती सांगतात. अनेक महिला कन्नड, तमिळ भाषक आहेत. इंग्रजी भाषेशी ओळख नाही. अपलोड-डाऊनलोड करणे, कोविनच्या माध्यमातून नोंदणी करणे ही सारी प्रक्रिया त्यांना किचकट वाटते. केवळ एकाच भाषेचा पर्याय का ठेवण्यात आला आहे, असाही प्रश्न थोडीबहुत अक्षरओळख असलेल्या महिला विचारतात.