
नवी दिल्लीः तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ( ) सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीत ८ ते ११ या तीन तासांमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे डीएमकेने मोठी आघाडी घेतली आहे. डीएमके १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर एआयएडीएमके ७९ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडून बहुमताचा जादुई आकडा हा ११८ इतका आहे. यानुसार डीएमके बहुमताच्या आकड्याच्याही पुढे आहे. तर मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हसन हे कोयम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर आहे. तामिळनाडूतील सुरवातीच्या कलात एआयएडीएमकेचे नेते पलानीस्वामी आणि डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी हे आघाडीवर आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. करोना नियमांचे पालन करून मतमोजणी केली जात आहे. तामिळनाडूतील २३४ जागांसाठी ४ हजार उमेदरवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या एग्झिट पोलमध्ये डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एआयएडीएमकेच्या नेत्या जे जयललिता आणि डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्यात विधानसभेची ही निवडणूक होत आहे. तामिळनाडूतील या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत.