मुंबई : भारतीय स्टेट बँकेने आज गृह कर्जदरात कपात केली आहे. बँकेने ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ६.७० टक्के इतका कमी केला आहे. तर ३० लाखांहून अधिक आणि ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ६.९५ टक्के आणि ७५ लाखांवरील गृह कर्जावर ७.०५ टक्के कर्जदर केला आहे. कमी झाल्याने घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे गृहस्वप्न आवाक्यात आले आहे. बँकेने महिला कर्जदारांसाठी ०.०५ टक्के सवलत देखील जाहीर केली आहे. त्याशिवाय योनो ऍपने कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला डिजिटल इन्सेन्टिव्ह म्हणून ०.०५ टक्के व्याजदर सवलत दिली जाईल, असे एसबीआयने आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. गृहकर्जाच्या बाजारपेठेत एसबीआय आघाडीवर आहे. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने बँकेने गृह कर्जदरात कपात केली आहे. या व्याजदर कपातीने ग्राहकांना आकर्षक व्याजदर उपलब्ध होईल. तसेच मासिक हप्त्याचा भार देखील कमी होईल, असे एसबीआयचे रिटेल आणि डिजिटल बँकिंगचे व्य्वस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले. याआधी एसबीआयने एप्रिल महिन्यात गृहकर्ज दर पूर्ववत केले होते. त्यामुळे गृहकर्जाचा किमान व्याजदर ६.९५ टक्के होता. आता तो ६.७० टक्के करण्यात आला आहे. गृहकर्ज विभागामध्ये आपले नेतृत्व अबाधित राखत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) गृहकर्जांच्या व्यवसायात ५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२४ पर्यंत ७ लाख कोटी रुपयांच्या गृह कर्ज वितरणाचे बँकेचे उद्दिष्ट आहे. वार्षिक ६.८० टक्के इतक्या कमी व्याजदर आकारणाऱ्या ‘एसबीआय’ने गृहकर्ज विभागात ३४ टक्के इतका वाटा बाजारपेठेत मिळवला आहे. दररोज सुमारे १००० गृहकर्ज ग्राहकांना कर्ज प्रक्रियेत बॅंक सामील करून घेत आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अनुदानावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सेंट्रल नोडल एजन्सी’ (सीएनए) म्हणून गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने नेमलेली ‘एसबीआय’ ही एकमेव बँक आहे. ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ या उपक्रमासाठी ‘पीएमएवाय’अंतर्गत गृहकर्जांचे प्रमाण ‘एसबीआय’ वाढवीत आहे. डिसेंबर २०२० बॅंकेने १,९४,५८२ गृहकर्जे मंजूर केली आहेत.