बीजिंग/दुबई: मागील वर्षी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या हिंसक संघर्षाबाबत चीन सरकारवर प्रश्न उपस्थित करणे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला महागात पडले. अमेरिकेला जात असताना दुबईत अटक करण्यात आली. मात्र, काही वेळेनंतर त्याची सुटकाही करण्यात आली. या घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे चीनने म्हटले आहे. भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने आपल्या शहीद जवानांची नावे आणि संख्या जाहीर केली होती. तर, चीनने जवळपास आठ महिन्यानंतर त्यांचे चार सैनिक ठार व एक अधिकारी जखमी झाला असल्याचे सांगितले. एसोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, १९ वर्षीय विद्यार्थी वांग याने सोशल मीडियावर चीन सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने चिनी सैनिकांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यास सहा महिन्यांचा कालावधी का लावला, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. वाचा: सोशल मीडियावरील या पोस्टनंतर त्याला त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याने इस्तांबूल गाठले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचा स्थायी निवासी असलेला वांग जिंगयू याला तुर्कीतील इस्तांबूलमध्ये जाताना संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये अटक केली होती. वाचा: रेडिओ फ्री एशियाने २७ मे रोजी दिलेल्या बातमीनुसार, चीनमधून निघाल्यानंतर दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर २० मे रोजी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीसाठी आवाहन केले होते. वांग हा न्यूयॉर्कला जाण्यासाठी दुबई विमानतळावर कनेक्टिंग फ्लाइटमध्ये जाण्यासाठी अमिरातीच्या विमानातून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. वाचा: चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, याबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे. संबंधित चिनी प्राधिकरणाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कोणताही अंदाज बांधता कामा नये असे त्यांनी म्हटले.