
मुंबई : जागतिक कमाॅडिटी बाजरात कच्च्या तेलाच्या किंमतीत किरकोळ घसरण झाल्याने आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९६.९४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९५.५२ रुपये आहे. आज मुंबईत डिझेलचा भाव ९३.८५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८६.४७ रुपये आहे. चेन्नईत ९१.१५ रुपये आणि कोलकात्यात ८९.३२ रुपये डिझेलचा भाव आहे. राजस्थानातील श्री गंगानगर येथे देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. येथे डिझेलचा भाव ९९.४९ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली . काल बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.२४ डाॅलरने घसरला आणि ७१.९८ डाॅलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२९ डाॅलरने कमी झाला आणि ६९.६७ डाॅलर झाला. प्रमुख अर्थव्यवस्था पुन्हा सुरु होत असल्याने तेलाच्या मागणीत सुधारणा होण्याची चर्चा तसेच जागतिक बाजारात इराणी तेल येण्याची शक्यता कमी असल्याने क्रूड तेलाच्या दरांना आधार मिळाला. इराणच्या आण्विक कराराच्या नूतनीकरणाबद्दल तेहरान आणि जागतिक शक्ती यांदरम्यानच्या चर्चांवर मार्केटचे बारीक लक्ष असेल. तथापि, अमेरिकेच्या राज्य सचिवांनी तेहरानवरील निर्बंध हटवले जाण्याची कमी शक्यता वर्तवली. अमेरिकेची प्रमुख आर्थिक आकडेवारी पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याने अमेरिकी चलन मजबूत झाले आणि क्रूड तेलाच्या दरात वाढ झाली. यामुळे डॉलरचे वर्चस्व असलेल्या क्रूड तेलावर दबावदेखील आला. मे २१२१ मध्ये (वार्षिक स्तरावर) चीनच्या क्रूड आयातीत १४.६ टक्क्यांची घट झाली. कठोर पर्यावरणीय नियमांमुळे तेथील तेल वापरावर मर्यादा आल्या. तेलाचा प्रमुख उपभोक्ता असलेल्या चीनकडून मागणीत घट झाल्याने बाजारावर परिणाम झाला आणि तेलाचे दर खाली आले.