करोना निर्बंधांमुळे व्यापारी जगत संकटात; क्षेत्राची वाटचाल बेरोजगारीकडे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 8, 2021

करोना निर्बंधांमुळे व्यापारी जगत संकटात; क्षेत्राची वाटचाल बेरोजगारीकडे

https://ift.tt/3AOXZxo
म. टा. प्रतिनिधी : करोना लाट आवाक्यात असतानाही सततच्या निर्बंधांमुळे व्यापार जगत संकटात आले आहे. त्यामुळे आता हे क्षेत्र झपाट्याने बेरोजगारीकडे जात आहे. निर्बंध हटवले न गेल्यास आंदोलनाची तयारी आर्थिक राजधानी मुंबईतील व्यापाऱ्यांनी केली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भय दाखवत राज्य सरकारने पुन्हा एकदा व्यापार व व्यवसायावर वेळेचे निर्बंध आणले आहेत. सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४पर्यंत व शनिवार-रविवारी बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. परंतु शनिवार-रविवारीच बाजारपेठेत नागरिक अधिक खरेदी करतात. त्यामुळे त्यादिवशी दुकाने बंद ठेवायला लावणे म्हणजे व्यापाऱ्यांना देशोधडीला नेण्यासारखे आहे, असे अखिल भारतीय महासंघाने (कॅट) म्हटले आहे. 'कॅट'चे मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'वर्षभराच्या करोना संकटामुळे मुंबई शहर व उपनगरातील किमान १५ टक्के दुकाने बंद पडली आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित क्षेत्रातील व्यापारीवर्ग सध्या भीषण अवस्थेत आहे. कसेबसे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न व्यापारी करीत असतानाच आता पुन्हा निर्बंध आणले गेले आहेत. व्यापार क्षेत्र मुंबईत मोठा रोजगार देते. अशावेळी हे क्षेत्र असे निर्बंधात येणे अयोग्य आहे. करोना हा दुपारी ४नंतर व फक्त शनिवार-रविवारीच येतो का, याचे उत्तर सरकारने द्यावे. निर्बंध मागे न घेतल्यास ठिकठिकाणचे व्यापारी असहकाराच्या पवित्र्यात आहेत.' मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ४ लाख व्यापारी आहेत. त्यातील किमान अडीच लाख व्यापारी हे किरकोळ क्षेत्रातील आहेत. तर अत्यावश्यक श्रेणीतील दुकानांची संख्या सुमारे २५ टक्के आहे. १५ टक्के सुमारे ५० हजारहून अधिक दुकाने मागील वर्षभरात बंद पडली आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्यांचा आकडा हा २ लाखांच्या घरात आहे. आता निर्बंध कायम राहिल्यास बेरोजगारांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.