रत्नागिरी : तालिका अध्यक्ष म्हणून पावसाळी अधिवेशन गाजवल्यानंतर शिवसेनेचे नेते ( Bhaskar Jadhav) यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं आहे. भास्कर जाधव यांच्या रुपाने शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद द्यावं आणि त्याबदल्यात शिवसेनेकडून एखादं मंत्रिपद काँग्रेसला मिळावं, असा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र भास्कर जाधव यांनी या संभाव्य प्रस्तावाला विरोध केला आहे. ते रत्नागिरी इथं माध्यमांसोबत बोलत होते. 'विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मला देण्याबाबत तीनही पक्षाचे एकमते झाले असले तरी मी ठामपणे सांगतो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन त्याबदल्यात विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नये. या मताशी मी ठाम आहे. सेनेकडे वन खाते तसेच राहून जर सर्वांनी मिळून जर विधानसभा अध्यक्षपद दिलं तरंच ते स्वीकारावे,' अशी भूमिका भा्स्कर जाधव यांनी पक्षाकडे मांडली आहे. 'शिवसेनेकडे महत्त्वाची खाती कमी' 'शिवसेनेने आपले मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये, कारण आधीच शिवसेनेकडे महत्वाची खाती नाहीत. मंत्रिपदे सुद्धा कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेने स्वतःचे मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये,' असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे. नारायण राणे यांच्यावर साधला रत्नागिरी इथं भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षपदावर भाष्य करत असतानाच केंद्रात नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'राज्यातही काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं होतं. मात्र तेव्हा त्यांनी कोकणात किती नवे उद्योग आणले?' असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसंच आता केंद्रीय मंत्रिपदाची शपध घेतल्यानंतर राणे यांनी आपल्या पदाचा उपयोग देशाबरोबरच कोकणालाही कसा होईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही भास्कर जाधव यांनी दिला आहे.