म. टा. प्रतिनिधी, शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेशात पेट्रोल प्रति लिटर ५८ रुपये तर नेपाळमध्ये ५६ रुपये लिटर आहे. मग भारतात पेट्रोल १०६ रुपये लिटर का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण बंद करा, अशी टीका मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आ. यांनी गुरुवारी केली. 'सन २०१४मध्ये देशात पेट्रोलचे दर ६८ रुपये प्रति लिटर असताना उद्विग्न होऊन ट्विटरवर स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ बच्चन, जनतेला सायकल वापरण्याचा सल्ला देणारे अक्षयकुमार, अनुपम खेर हे कलाकार आज मूग गिळून गप्प का बसले आहेत,' असा थेट सवाल जगताप यांनी केला. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ, महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. मुंबईतील अनेक वॉर्डमध्ये मुंबई काँग्रेसने निषेध आंदोलन केले. बोरिवली, धारावी, आझाद मैदाननजीक मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नागपूरमध्ये सायकल यात्रा 'केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे', अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल यात्रा काढण्यात आली. त्यांच्यासोबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी आदी सहभागी झाले होते. नाशिकमध्ये सायकल फेरी नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे शहरातून सायकल फेरी काढून केंद्राच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. एम. जी. रोड येथील काँग्रेसच्या कार्यालयापासून फेरीला सुरुवात झाली. आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांनी या फेरीचे नेतृत्व केले.